- ३८ उद्योगसंस्थांचे ४८१ स्पर्धक सहभागी; केस स्टडी, स्लोगन आणि पोस्टर स्पर्धेत १९५ नामांकने…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ जुलै २०२६) :- उद्योग क्षेत्रातील उत्पादने, सेवा आणि प्रक्रियांच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करून ग्राहकांच्या अपेक्षा अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या उद्देशाने क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया (QCFI) पुणे शाखेच्या वतीने ‘गुणवत्ता व्यवस्थापन कन्व्हेन्शन २०२६’ चे आयोजन करण्यात आले. भोसरी येथील एक्सलन्स सेंटर येथे पार पडलेल्या या कन्व्हेन्शनला विविध उद्योगसंस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कन्व्हेन्शनमध्ये ३८ उद्योगसंस्थांतील ४८१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. केस स्टडी, स्लोगन आणि पोस्टर या तीन विभागांमध्ये एकूण १९५ नामांकने प्राप्त झाली. विविध उद्योगसंस्थांच्या संघांनी गुणवत्ता व्यवस्थापनाशी संबंधित नावीन्यपूर्ण संकल्पना, सुधारित प्रक्रिया आणि कार्यपद्धतींचे प्रभावी सादरीकरण करून आपले कौशल्य प्रदर्शित केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन बॉश चेसिस सिस्टीम्स इंडिया कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी जगदीप सिंग बिरदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. समारोप समारंभात एसकेएफ इंडिया इंडस्ट्रियलचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना गुणवत्तेच्या निकषांवर आधारित सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके तसेच स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.
यावेळी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पुणे शाखा परिषद सदस्य माधव बोरवणकर, पवनकुमार रौंदळ, धनंजय वाघोलीकर आणि परवीन तरफदार यांच्यासह विविध उद्योगसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
केस स्टडी स्पर्धेचे मूल्यमापन अजय अंबिके, प्रभाकर चोपडे, ऋतू मेहता, धनंजय वाघोलीकर, पंकज बडगुजर, पवन गुजराती, संजय लकडे, चंद्रशेखर बापट, प्रशांत मुधळवाडकर, व्यंकटेश राव, विठ्ठल वाघचौरे, पवनकुमार रौंदळ आणि माधव बोरवणकर यांनी केले. तर स्लोगन आणि पोस्टर विभागाचे परीक्षण राहुल गुरुळे आणि ललिता परदेशी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले. कन्व्हेन्शनच्या यशस्वी आयोजनासाठी रहीम मिर्झा बेग, प्रशांत बोराटे आणि चंद्रशेखर रुमाले यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कन्व्हेन्शनच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात गुणवत्ता व्यवस्थापनाची संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले. सहभागी संस्थांनी आपल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण करत गुणवत्ता, सातत्यपूर्ण सुधारणा आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोनाचा संकल्प व्यक्त केला.
फोटो ओळ गुणवत्ता व्यवस्थापन कन्व्हेन्शन २०२६ मधील विजेत्या संघांसमवेत (डावीकडून) पुणे शाखा परिषद सदस्य माधव बोरवणकर, प्रमुख पाहुणे प्रमोद कुलकर्णी, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे तसेच अन्य मान्यवर.

















