- २७ वर्षीय विवाहितेची टोकाची पायरी..
- पती अर्धा तासासाठी बाहेर; परत येताच समोर आले धक्कादायक दृश्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २४ जुलै २०२६) :- चेहऱ्यावर आलेल्या फोडांमुळे मानसिक तणाव वाढल्याची शक्यता व्यक्त होत असताना, आंबेठाण येथे एका २७ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पती घराबाहेर गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
मृत विवाहितेचे नाव अश्विनी संदीप पाटील (वय २७) असे असून, त्या आंबेठाण येथे वास्तव्यास होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांच्या चेहऱ्यावर काही दिवसांपासून फोड आले होते. त्यावर उपचार घेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, या त्रासामुळे त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
मंगळवारी (दि. २१) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास त्यांचे पती संदीप पाटील हे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर गेले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर ते परतले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने डायल ११२ वर संपर्क साधला.
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला. घरात स्वयंपाकघरातील लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने अश्विनी यांनी गळफास घेतल्याचे आढळले. त्यांना तातडीने चाकण ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार मृत महिला चेहऱ्यावरील फोडांमुळे मानसिक तणावात होत्या. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.


















