- खराळवाडी-गांधीनगरवासीयांचा संताप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ जुलै २०२६) :- पिंपरीतील खराळवाडी आणि गांधीनगर परिसरात एका फेजच्या वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक नागरिकांना रात्रभर अंधारात काढावी लागली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरांतील दिवे, पंखे आणि अन्य विद्युत उपकरणे बंद पडली. उकाडा, डासांचा वाढता त्रास आणि अंधारामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
अग्रसेन भवन, गावठाण, सुदर्शन चौक, चांदणी चौक, आत्मनगर, भगवद्गीता मंदिर तसेच गांधीनगरातील सुमेध बुद्धविहार आणि दुर्गामाता मंदिर परिसरातील काही रस्त्यांवरील पथदिवेही बंद राहिल्याने नागरिकांना रात्री ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. नागरिकांनी महावितरणच्या हेल्पलाइनवर वारंवार तक्रारी नोंदवल्या.
दरम्यान, सहायक अभियंता राहुल पालके यांनी सांगितले की, एका फेजमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. तक्रार मिळताच तांत्रिक पथकाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वितरण यंत्रणेची सखोल तपासणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“खराळवाडी-गांधीनगर परिसरातील एका फेजमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही भागाचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित झाला होता. तक्रार प्राप्त होताच महावितरणचे तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिघाड शोधून आवश्यक दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात आली आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी संबंधित फीडर, केबल तसेच वितरण यंत्रणेची सखोल तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत.”
राहुल पालके, सहायक अभियंता, महावितरण कार्यालय, खराळवाडी…

















