- नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा आयुक्तांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २४ जुलै २०२६) :-शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टनंतर मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण करणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांचा ओला कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांद्वारे उचलला जाणार नाही. संबंधित सोसायट्यांनी स्वतःच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे बंधनकारक राहणार आहे.
महापालिकेने यापूर्वी १ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, विविध सोसायट्यांच्या मागणीनंतर ती वाढवून १५ ऑगस्ट करण्यात आली आहे. या मुदतीनंतर नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायट्या व मोठे कचरा उत्पादक यांच्यावर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
याशिवाय, घरगुती, व्यावसायिक आस्थापना, कार्यालये आणि दुकाने येथून निर्माण होणारा कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि घातक अशा चार प्रकारांत वेगळा करूनच महापालिकेकडे द्यावा लागणार आहे. एकत्रित कचरा स्वीकारला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे मोशी डेपोवरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्थानिक कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे कचऱ्याची वाहतूक कमी होऊन परिसरातच त्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

















