- भरधाव कंटेनरची दुचाकीला मागून धडक; चालकाविरुद्ध दक्षिण महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खेड (दि. २७ जुलै २०२६) :- खेड तालुक्यातील निघोजे परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात आई आणि तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास दिगंबर उतलवाड (वय ४०) हे त्यांच्या हिरो स्प्लेंडर (एमएच १४ जेसी ५८८३) या दुचाकीवरून चाकणहून खालुंब्रे येथे जात होते. त्यांच्या दुचाकीवर मेहुणी मंगल प्रल्हाद चोपलवाड (वय २५) आणि तिचा दीड वर्षांचा मुलगा देवांश हेही प्रवास करत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास निघोजे येथील हॉटेल पंचरत्नसमोर भरधाव कंटेनर (जीजे २७ टीजी ६२४९) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात मंगल चोपलवाड आणि देवांश यांचा मृत्यू झाला, तर हरिदास उतलवाड यांच्या कंबरेवरून कंटेनरचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी माधव नारायण चोपलवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक सचिन यादव (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर करीत आहेत.


















