न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जुलै २०२६) :- पवना धरण शंभर टक्के भरल्यानंतर शहरातील १५ टक्के पाणी कपात तातडीने रद्द होईल, अशी नागरिकांची अपेक्षा असतानाच महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात या मुद्द्यावर एकमत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
महापौर रवी लांडगे यांनी पाणी कपात रद्द करण्याची सूचना प्रशासनाला केली असली, तरी प्रशासनाने जलसंपदा विभागाच्या निर्णयाकडे बोट दाखवत ऑक्टोबरपर्यंत कपात मागे घेणे शक्य नसल्याची भूमिका घेतली आहे.
जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार १९ जूनपासून शहरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र, जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे कपात तातडीने हटवावी, अशी मागणी सर्वसाधारण सभेतही झाली. मात्र, अंतिम निर्णय जलसंपदा विभागाचाच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, पदाधिकाऱ्यांनी विभागाशी पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय मिळवावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.


















