- ‘प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना स्मरून भव्य मॅरेथॉनचे आयोजन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जुलै २०२६) :- लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतावादी व परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशनच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिली आगळीवेगळी ‘साहित्यरत्न दौड २०२६’ मॅरेथॉन स्पर्धा २ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘प्रबोधन पर्व २०२६’ उपक्रमांतर्गत ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येत असून, महापालिका, आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन, आर्टी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि कलारंग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
स्पर्धेला सकाळी ५ वाजता बर्ड व्हॅली उद्यान, नोव्हेल चौक, चिंचवड येथून सुरुवात होईल. बर्ड व्हॅली उद्यान चौक, निगडी-भोसरी रोड, केएसबी चौक, पिंपरी-चिखली रोड, आयुक्त निवासस्थान, लाल बहादूर शास्त्री मार्ग (बीआरटी), कालेवाडी बीआरटी कॉरिडॉर, मदर तेरेसा उड्डाणपूल, पवना नदी पूल, जोतिबा गार्डन (पवनानगर) असा मार्ग पूर्ण करून स्पर्धक पुन्हा बर्ड व्हॅली उद्यान येथे दाखल होतील.
ही दौड केवळ क्रीडा स्पर्धा नसून सामाजिक समरसता, आरोग्यदायी जीवनशैली आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे जनजागरण करणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या ऐतिहासिक उपक्रमात नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.


















