- लक्ष्मी चौकातील थरारक घटना..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. ३१ जुलै २०२६) :- हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौकात अनधिकृत होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरू असताना अचानक क्रेन कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात जवळील दुकाने, हॉटेल्स तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित यंत्रणेकडून होर्डिंग हटविण्याची कारवाई सुरू असताना क्रेनचा तोल गेला आणि ती अचानक बाजूच्या व्यावसायिक आस्थापनांवर कोसळली. या घटनेमुळे दुकानांचे शटर, फलक, काच तसेच इतर मालमत्तेचे नुकसान झाले. अपघात घडताच परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली.
या दुर्घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. क्रेन हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सुदैवाने त्या वेळी परिसरात मोठी गर्दी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही; अन्यथा ही दुर्घटना अत्यंत भीषण ठरली असती.


















