- परस्परांविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हे दाखल…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. ३१ जुलै २०२६) :- मावळ तालुक्यातील आंबी येथील गट क्रमांक ४३० मधील जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या फिर्यादीत रंगनाथ शंकर घोजगे (वय ५५, रा. आंबी) यांनी स्वप्नील भागवत, संकेत दुडे आणि गणेश तांगडे (सर्व रा. इंदोरी) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. आरोपींनी संगनमत करून शेडच्या पत्र्याचे नुकसान केले, शेतीची अवजारे बाहेर फेकून दिली, नावाच्या फलकावर काळा रंग फासून नुकसान केले तसेच जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
तर दुसऱ्या प्रकरणात स्वप्नील सूर्यकांत भागवत (वय ३८, रा. इंदोरी) यांनी रंगनाथ घोजगे, अंकुश घोजगे आणि मच्छिंद्र घोजगे (रा. आंबी) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. संबंधित जागेवर मालकीचा बोर्ड लावण्यासाठी गेले असता आरोपींनी लाकडी काठीने मारहाण केली, शर्टाची कॉलर पकडून खाली पाडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोन्ही तक्रारींनुसार तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


















