- पिंपरीतील शंकरराव मासूळकर नेत्र रुग्णालयाला दिली भेट..
- रुग्णांशी संवाद साधत प्रशासनाला दिल्या विविध सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०३ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच लगतच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, वैद्यकीय सुविधा घेताना त्यांना कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी पिंपरीतील शंकरराव मासूळकर नेत्र रुग्णालयाला भेट दिली. वैद्यकीय सेवा, आधुनिक सुविधा, स्वच्छता तसेच रुग्णालयातील कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या सेवा-सुविधांबाबत अभिप्राय जाणून घेतला. त्यानुसार डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा देण्याच्या सूचना केल्या.
या पाहणी दौऱ्यात सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, नेत्ररोग विभागाच्या प्राध्यापिका व विभागप्रमुख डॉ. रूपाली महेशगौरी तसेच रुग्णालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सभापती बारणे यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक कले. नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक उपकरणे आणि सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले. रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या विविध नेत्रसेवा, शस्त्रक्रिया सुविधा आणि योजनांबाबत महापालिकेने विविध माध्यमांतून जनजागृती मोहीम राबवून या सेवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी. उपचारासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी उपचाराची गुणवत्ता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे सहकार्य, प्रतीक्षा कालावधी, स्वच्छता तसेच इतर सुविधांबाबत माहिती घेतली. रुग्णांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेत त्यावर सकारात्मक पद्धतीने कार्य करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
“शंकरराव मासूळकर नेत्र रुग्णालय हे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे नेत्र रुग्णालय आहे. येथे अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून दर्जेदार नेत्रसेवा दिली जाते. मात्र, या सुविधा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे. व्यापक जनजागृती केल्यास प्रत्येक गरजू नागरिकाला या सेवांचा लाभ मिळेल, यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे. रुग्णसेवेच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करणे, स्वच्छता राखणे आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महापालिका नागरिकांना सर्वोत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.”
– मा. अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका


















