न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांच्या दैनंदिन सेवांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेत पशुरुग्णालयातील पशुवैद्यकीय अधिकारी, पशुशल्यचिकित्सक व इतर मनुष्यबळाच्या सेवेला नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय विविध विभागांसाठी फर्निचर खरेदी, रस्ते, बीआरटी रेलिंग व फुटपाथ दुरुस्ती, आयटीआयच्या वार्षिक परीक्षेसाठी साहित्य खरेदी, जलशुद्धीकरण केंद्रातील आपत्ती व्यवस्थापनासाठी पंपांच्या देखभालीस मंजुरी देण्यात आली. वायसीएम रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या नामकरणाचा प्रस्ताव महापालिका सभेकडे पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
सार्वजनिक शौचालयांच्या यांत्रिक साफसफाई, आपदा मित्र व ट्रेनी फायरमन यांच्या मानधनासाठी निधी, कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या देखभालीस मुदतवाढ, क्रीडा शिष्यवृत्ती निधीत वाढ आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. या निर्णयांमुळे अत्यावश्यक सेवा, क्रीडा, स्वच्छता व पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असल्याचे अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांनी सांगितले.


















