- विविध प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने चर्चा न केल्याचा आरोप; आयुक्तांना संपाची कायदेशीर नोटीस सादर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने विविध प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याचा आरोप करत १३ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात औद्योगिक कलह कायदा, १९४७ च्या कलम २२ अन्वये महापालिका आयुक्तांना संपाची अधिकृत नोटीस देण्यात आली आहे.
महासंघाने २५ मार्च २०२६ रोजी मागण्यांचे निवेदन सादर केले होते. त्यानंतर वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने चर्चा करण्यासाठी वेळ दिला नसल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत असल्याचे महासंघाने नमूद केले आहे.
यापूर्वी २९ जुलै २०२६ रोजीही महासंघाने आयुक्तांना पत्र देऊन मागण्यांवर तातडीने बैठक घेऊन पुढील भूमिका निश्चित करण्याची विनंती केली होती. मात्र त्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संपाची नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.
महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे आणि सरचिटणीस अभिमान अरुण मोसले यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस देण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढावा, अन्यथा १३ ऑगस्टपासून कायदेशीर संप सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


















