न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. ०५ ऑगस्ट २०२६) :- हिंजवडी परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने विश्वासघात करत मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ९३ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २४ जुलै ते २६ जुलै २०२६ या कालावधीत माण रोडवरील पांडवनगर येथील खानदेश हॉटेलमध्ये घडला. याप्रकरणी सौ. मोनिका सचिन वाडकर (वय ४३, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, हॉटेलमधील पेमेंट स्वीकारण्यासाठी महावीर भागवत पवार (रा. उपळाई, ता. माढा, जि. सोलापूर) याच्याकडे ऑपो कंपनीचा सुमारे ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल सोपविण्यात आला होता. या मोबाईलद्वारे आरोपीने विविध व्यवहार करून ५३ हजार रुपये काढल्याचा आरोप आहे. तसेच इतरांना देण्यासाठी त्याच्याकडे सोपविण्यात आलेली ३५ हजार रुपयांची रोख रक्कमही त्याने स्वतःकडे ठेवून अपहार केला.
मोबाईल, त्यातील आर्थिक व्यवहारातून काढलेली रक्कम आणि रोख रक्कम असा एकूण ९३ हजार रुपयांचा अपहार करून आरोपी फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३१६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


















