न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. ०७ ऑगस्ट २०२६) :- हिंजवडी परिसरातील मारुंजी येथील सेवन स्टार सिटीमधील वैष्णवी पीजीमध्ये प्रेयसीच्या संशयातून एका तरुणाने पीजी मॅनेजरचा लोखंडी रॉडने खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (६ ऑगस्ट) दुपारी घडली. या हल्ल्यात संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश महादेव झांबरे (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीजी व्यावसायिक नरसिंम्मा तिरुपालु दरिशी (वय ३२) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी दिनेश झांबरे हा पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा (एमएच १३ ईके ५८२८) कारमधून वैष्णवी पीजी येथे आला. त्याची प्रेयसी निकिता शिवाजी दणाने (वय २१) ही पीजी मॅनेजर सागर साहेबराव गायकवाड (वय २२) याच्यासोबत राहत असल्याच्या संशयातून त्याने संतापाच्या भरात सागर गायकवाड याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर निकिता दणाने हिच्यावरही लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करून तिला गंभीर जखमी केले.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) व १०९(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.


















