न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. ०७ ऑगस्ट २०२६) :- ताथवडे येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील मुख्य प्रवेशद्वार कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी शाळेचे प्राचार्य आणि संबंधित प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजू शिवाजी पांढरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी सकाळी सुमारे ८.१० वाजता सुरक्षा रक्षक संजय नागनाथ कांबळे हे शाळेचे मुख्य लोखंडी प्रवेशद्वार उघडत असताना गेट त्यांच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान २ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.
तपासादरम्यान मुख्य प्रवेशद्वाराची योग्य देखभाल, दुरुस्ती, मजबुतीकरण आणि नियमित सुरक्षितता तपासणी करण्यात निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले. वैद्यकीय कागदपत्रे, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळाची पाहणी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रथमदर्शनी शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे निष्पन्न झाल्याने प्राचार्य आणि गेटच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनेतील जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


















