न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ ऑगस्ट २०२६) :- थेरगाव हद्दीतील डांगे चौकाजवळील ‘दिल्ली-६’ हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी गॅस सिलेंडर पुरवठादाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१) आणि ३२४(५) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ललित सुकदेव मोरे यांनी फिर्याद दिली असून, मुकेश बिष्णोई (वय अंदाजे २५, रा. लक्ष्मीनगर, हिंजवडी, मूळ रा. राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी हॉटेलमध्ये गॅस सिलेंडर बदलण्यासाठी आला होता. यावेळी आवश्यक ती खबरदारी न घेता हलगर्जीपणे सिलेंडर बदलल्याने गॅस गळती झाली. त्यानंतर हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली.
या आगीत हॉटेलमध्ये काम करणारा भुरा ऊर्फ मोहम्मद शहजाद (वय २२, मूळ रा. रामपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. डांगे चौक, वाकड) गंभीर भाजला. तसेच धुरामुळे त्याचा श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला. आगीत हॉटेलचेही मोठे नुकसान झाले.
घटनेनंतर वाकड पोलिसांनी तपास करून गॅस सिलेंडर बदलताना निष्काळजीपणा झाल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित पुरवठादाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक झिंझुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


















