न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०७ ऑगस्ट २०२६) :- थेरगाव येथील महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाला धक्काबुक्की करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकाविरोधात काळेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(ब) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी रमेश सुदाम भवाळ (वय २१, रा. काळाखडक, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सुरक्षा रक्षकाचे नाव प्रकाश शिंगारे (वय ५५, रा. थेरगाव) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.२० वाजता फिर्यादी थेरगाव रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील मेल जनरल मेडिसिन वॉर्डमध्ये वडिलांच्या पलंगाशेजारी खाली झोपले होते. त्यावेळी सुरक्षा रक्षकाने त्यांना उठवून वॉर्डच्या बाहेर जाण्यास सांगितले. फिर्यादी बाहेरील पॅसेजमधील बाकाकडे जात असताना सुरक्षा रक्षकाने मागून जोरात ओढून लोखंडी बाकावर ढकलल्याचा आरोप आहे.
या धक्क्यामुळे फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन दंडाचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे काळेवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंतनू निबाळकर करत आहेत.


















