- शेअरिंग व मीटर पद्धतीने सेवा; ‘नो रिफ्युजल’ धोरण लागू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो प्रवाशांची लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करण्यासाठी पुणे महामेट्रो व महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेट्रो फीडर रिक्षा सेवा’ सुरू करण्यात आली. पीसीएमसी मेट्रो स्टेशन येथे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले.
यावेळी आमदार उमाताई खापरे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
ही सेवा शेअरिंग तसेच मीटर पद्धतीने उपलब्ध राहणार आहे. गेट क्रमांक १ वरून घरकुल, जाधववाडी, कुदळवाडी, चिखली, अजमेरा कॉलनी, केएसबी चौक, मोरवाडी कोर्ट आदी भागांसाठी; गेट क्रमांक २ वरून अजमेरा, मासुळकर कॉलनी, खराळवाडी, डी.वाय. पाटील कॉलेज आदी भागांसाठी, तर गेट क्रमांक ४ वरून पिंपरी गाव, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, निगडी, काळेवाडी, चाफेकर चौक आदी मार्गांवर सेवा मिळणार आहे.
रिक्षाचालकांसाठी ‘नो रिफ्युजल पॉलिसी’ लागू करण्यात आली असून प्रवाशांना भाडे नाकारल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यासोबत रिक्षाचालकांना नियमित रोजगाराची संधी मिळणार असल्याचे डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले.


















