- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई; ४९ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात तब्बल ४९ लाख २० हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी राजस्थानातून मुख्य आरोपीला अटक केली. राजेंद्र गणराज नागर (वय ३२, रा. जलखेडा, ता. नैनवा, जि. बूंदी, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपीने सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची ओळख पटवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांची माहिती मिळवून पीएफमधील पैसे जमा झाल्याचे सांगत विविध बँक खात्यांमध्ये रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. या माध्यमातून आर्थिक फसवणूक करण्यात आली.
तपासात आरोपीने सहा बँक खात्यांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित बँक खात्यांच्या तांत्रिक व आर्थिक विश्लेषणातून आरोपीचा माग काढण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थानमधून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.


















