- समग्र शिक्षण अभियानंतर्गत पालिकेत कार्यरत असणारे ते १६ कर्मचारी शासनसेवेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- तब्बल दोन दशकांहून अधिक काळ कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. राज्य शासनाने ऑगस्ट २०२६ मध्ये राज्यातील ३ हजार २७६ कर्मचाऱ्यांना नियमित शासकीय सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट फायदा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १६ कर्मचाऱ्यांना होणार असून, त्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विविध पदांवर कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीने सेवा बजावली. मात्र, दीर्घ सेवा करूनही नोकरीची शाश्वती नसल्याने नियमित सेवेसाठी त्यांचा संघर्ष सुरू होता. शासनाच्या निर्णयामुळे आता या कर्मचाऱ्यांना सेवेत स्थैर्य मिळणार आहे.
शासनाने ही नियुक्ती ‘विशेष बाब’ म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या पदांना समकक्ष असलेल्या वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यामुळे कंत्राटी सेवेमधील अनिश्चितता दूर होऊन नियमित शासकीय सेवेला लागू असलेले वेतन, वेतनवाढ आणि अन्य सेवाविषयक लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
समग्र शिक्षा अभियान हे केंद्र पुरस्कृत अभियान असून, पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शैक्षणिक सुविधा व पायाभूत सुविधा मजबूत करणे तसेच सर्वसमावेशक शिक्षणाला चालना देणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
दरम्यान, नियमित सेवेत समावेशाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. “२२ वर्षे कंत्राटी पद्धतीने काम केल्यानंतर नियमित सेवेत सामावून घेण्याचा निर्णय आमच्यासाठी मोठा दिलासा आहे. अनेक वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी झाला,” अशी प्रतिक्रिया समग्र शिक्षा अभियानातील डेटा एन्ट्री ऑपरेटर युवराज वाघ यांनी व्यक्त केली.


















