- नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांचा विधायक उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- वाकड प्रभाग क्रमांक २५ मधील ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले रेशन कार्ड तसेच एनसीएमसी कार्डचे वाटप नगरसेवक कुणाल भाऊ वावव्हळकर यांच्या सौजन्याने करण्यात आले. नागरिकांना शासकीय सुविधा आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना अनेकदा आवश्यक कागदपत्रांची अडचण निर्माण होते. ही अडचण लक्षात घेऊन प्रभागातील नागरिकांसाठी रेशन कार्ड व एनसीएमसी कार्ड उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष कार्डांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. परिसरातील नागरी सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणींबाबत उपस्थित नागरिकांनी त्यांच्याशी चर्चा केली. या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
“प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी मी २४ तास, सातही दिवस उपलब्ध राहणार आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक उपक्रम राबविले जातील,” असे कुणाल वाव्हळकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, शहर सुधारणा समितीचे सदस्य तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई)चे गटनेते कुणाल भाऊ वाव्हळकर होते.
यावेळी नगरसेविका श्रुती राम वाकडकर, वृक्ष प्राधिकरण समितीचे संभाजी बारणे, सोनम वाव्हळकर, कामगार नेते विनोद चांदमारे, युवा उद्योजक किरण समिंदर, निवेदिता काळे, मुकुंद डमकले, पुरुषोत्तम गोडबोले, संजय बोधले यांच्यासह प्रभागातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळाल्याने त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी अशा प्रकारचे सेवा उपक्रम नियमितपणे राबविण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.
दरम्यान, नागरिकांच्या अडचणी केवळ ऐकून न घेता त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही करण्याला प्राधान्य दिले जाईल, अशी भूमिका आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली. त्यामुळे रेशन कार्ड आणि एनसीएमसी कार्ड वाटपाच्या या उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांसह प्रभागातील नागरिकांनी स्वागत केले.


















