- ‘तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली २०२६’ उत्साहात..
- राष्ट्रप्रेमासोबत आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ ऑगस्ट २०२६) :- पिंपळे सौदागर येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रप्रेम, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने ‘तिरंगा सन्मानार्थ सायकल रॅली २०२६’चे आयोजन करण्यात आले. शेकडो नागरिक आणि सायकलप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅली देशभक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडली.
उन्नती सोशल फाऊंडेशन, गोविंद ग्रुप, इंडो ॲथलेटिक सोसायटी आणि चॅलेंजर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन सहभाग नोंदविला.
यावेळी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका डॉ. कुंदाताई संजय भिसे आणि नगरसेविका अनिताताई संदीप काटे, उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी शत्रुघ्न (बापू) काटे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तिरंग्याच्या सन्मानासाठी आयोजित सायकल रॅली हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. राष्ट्रप्रेमासोबत आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या माध्यमातून दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी राष्ट्रध्वज हा स्वाभिमान आणि एकतेचे प्रतीक असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
रॅलीतील सहभागींसाठी टी-शर्ट, BIB, मेडल आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःची सायकल नसलेल्या नागरिकांसाठी e-z pedal यांच्या सहकार्याने इलेक्ट्रिक सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिक, सायकलस्वार, स्वयंसेवक आणि आयोजकांच्या सहकार्याने रॅली यशस्वी झाली.


















