न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२६) :- वाकड परिसरात गुरुवारी (दि. २०) दुपारी स्कूल बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने बसमधील ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना यापूर्वीच शाळेत सोडण्यात आले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत वाकड परिसरात ही घटना घडली. संबंधित बसने इंदिरा स्कूलमधील ३५ हून अधिक विद्यार्थ्यांना शाळेत सोडल्यानंतर ती परतीच्या मार्गावर होती. दरम्यान, चालकाला जळल्याचा वास येऊ लागला. काही वेळातच बसमधून धूर निघू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि बाहेर पडला.
काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग नियंत्रणात आणून बसमधील आग विझवली.
घटनेच्या वेळी बसमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, धावत्या स्कूल बसला आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

















