- नगरसेवक म्हणतात, “भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; अन्यथा नागरिक अधिकाऱ्यांना दगडं मारतील”…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 20 ऑगस्ट 2026) :- चिखलीतील म्हेत्रेवस्ती येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद आज गुरुवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका आवारात आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान महापौरांना निवेदन देत भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक यश साने, विकास साने, विराज लांडे आदी उपस्थित होते. पीडित चिमुकली आणि तिचे पालकही महासभेत उपस्थित होते.
९ ऑगस्ट रोजी घराबाहेर खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीला चोहोबाजूंनी घेरून तिच्यावर हल्ला केला होता. शेजारील नागरिकांनी धाव घेत तिची सुटका केली. या हल्ल्यात तिच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या.
दरम्यान सभेत बोलताना, नगरसेवक यश साने यांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करत, “अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिकांचा उद्रेक होईल. लोकं अधिकाऱ्यांना दगड मारतील,” असा संतप्त इशारा दिला. तसेच भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टरची उभारणी करून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

















