- महापौरांवर दबाव; सभा १७ सप्टेंबरपर्यंत लांबणीवर..
- विकासकामांचे निर्णय महिनाभर लटकले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग चढला. शहरातील मयत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून तसेच मानपत्र प्रदान केल्यानंतर मेट्रो आणि ईआरटीएस प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मात्र सभेचे कामकाज विकासाच्या मुद्द्यांऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळामुळे चर्चेत आले.
भाजपचे नगरसेवक विनोद नढे यांनी ‘वंदे मातरम’च्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी त्यांनी काॅग्रेसने वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप केला. त्याचा निषेध म्हणून त्यांनी सभा तहकूब करण्याचा ठराव मांडला. या ठरावाला भाजपचे नगरसेवक शीतल शिंदे यांनी अनुमोदन दिले.
यानंतर भाजपचे नगरसेवक थेट महापौरांच्या दालनात दाखल झाले. सभा तहकूब करण्याची एकमुखी मागणी करत भाजप नगरसेवकांनी गोंधळ घातल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. महापौरांवर दबाव निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.
दरम्यान, विरोधकांनी सभा तहकूब करण्यास स्पष्ट विरोध केला. महापालिकेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक असताना सभा गुंडाळणे योग्य नसल्याचे विरोधकांनी सांगितले. शिवसेनेच्या नगरसेवकांनीही सभा पूर्णपणे तहकूब न करता केवळ दहा मिनिटांसाठी तहकूब करून पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
मात्र, भाजप नगरसेवकांच्या मागणीसमोर अखेर सभा १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेचे कामकाज राजकीय गोंधळातच वाहून गेले.
सभेचा शेवट ‘वंदे मातरम’ गीताने करण्यात आला. मात्र, विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि महापालिकेच्या कामकाजावर चर्चा होण्याऐवजी राजकीय मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे सर्वसाधारण सभा चर्चेचा विषय ठरली.

















