न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२६) :- वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून, परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी आणि ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगरसेविका श्रुती राम वाकडकर, भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष राम वाकडकर, नगरसेविका रेश्मा भुजबळ आणि चेतन भुजबळ उपस्थित होते.
हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचारी, वाढती लोकसंख्या, राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या प्रमाणातील वाहतूक, विविध ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची विकासकामे आणि वाढती वाहनसंख्या यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
विशेषतः रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत असून, आपत्कालीन परिस्थितीत त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी किमान ३० ते ५० अतिरिक्त पोलीस कर्मचारी तसेच आवश्यक संख्येने ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास प्रमुख चौक, जंक्शन, सर्व्हिस रोड, शाळा परिसर तसेच आयटी परिसरातील वाहतूक अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येईल. गर्दीच्या वेळेत वाहतूक नियमन, पार्किंग व्यवस्था आणि पर्यायी मार्गांचे व्यवस्थापनही अधिक सक्षमपणे करता येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वाकड, हिंजवडी, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्या विविध विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, नागरिकांच्या हितासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे यावेळी सांगण्यात आले.


















