- विकासकामांना महिनाभर ब्रेक लावल्याचा विश्वजीत बारणेंचा आरोप..
- कुत्रे, खड्डे, मेट्रो, पर्यावरणासह शहराचे प्रश्न पुढे ढकलल्याचा सत्ताधाऱ्यांवर आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २० ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची महासभा ‘वंदे मातरम्’ गीताच्या नावाखाली तहकूब करण्यात आल्यावर शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. सभेनंतर शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचे विषय प्रलंबित राहिल्याचा आरोप केला.
यावेळी नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस उपस्थित होत्या.
विश्वजीत बारणे म्हणाले की, महासभेच्या अजेंड्यावर शहराच्या दृष्टीने ३० पेक्षा अधिक महत्त्वाचे विषय होते. ‘वंदे मातरम्’ गीताला विरोध नसून त्यासाठी सभा तहकूब करण्याऐवजी केवळ दहा मिनिटांची तहकुबी करण्याची मागणी केली होती. मात्र, सभा पुढे ढकलल्यामुळे विकासकामांना ब्रेक लागला आहे.
“पुढील महिन्यात १७ तारखेला गणपती उत्सव सुरू होत आहे. त्यामुळे आजच महासभा घेणे गरजेचे होते. कुत्र्यांचा प्रश्न, रस्त्यांवरील खड्डे, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, पाणी कपातीचा निर्णय आणि स्थापत्य विभागाशी संबंधित अनेक विषय महिनाभर पुढे ढकलले जातील. यामुळे शहराचे नुकसान होणार आहे,” असा आरोप बारणे यांनी केला.
मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळण्यासह शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे विषय सभेत चर्चेला येणे अपेक्षित होते. मात्र, सभेच्या तहकुबीमुळे विकासाला अडथळा निर्माण झाल्याचे बारणे म्हणाले. अजेंड्यावर कचरा व्यवस्थापनासह दहा लाख रुपयांच्या विषयांचाही समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, नगरसेविका सुलभा उबाळे यांनी भाजपचे पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या भूमिकेचा निषेध केला. महासभा चालू न दिल्याने शहराच्या विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप त्यांनी केला.

















