- ५० हजारांच्या हप्त्याची मागणी करत तरुणाला जीवे मारण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- भुजबळ चौकातील डॉलफिन ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात घुसून तोडफोड करत दरमहा ५० हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. २४ ऑगस्ट २०२६) पहाटे चारच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक हनुमंत बारवे (वय २३) यांच्या ट्रॅव्हल्स कार्यालयात आरोपी वकास काळे (वय २८, रा. म्हातोबा नगर, वाकड) याने प्रवेश केला. त्याने कार्यालयातील दोन संगणक, प्रिंटर, वायफाय मशीन आणि कॅमेरा डिव्हाइसची तोडफोड केली. तसेच फिर्यादी यांच्या हातातील दोन्ही मोबाईल फोडले. कार्यालयातील फ्लोअर आणि टेबलचेही नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीला धमकावत दरमहा ५० हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास कार्यालय चालवू देणार नाही, अशी धमकी देत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी बारवे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक सोनुने पुढील तपास करीत आहेत.


















