- मोक्काअंतर्गत २३ जणांवर कारवाई; दोघांवर एमपीडीए, सात जण तडीपार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- ईद-ए-मिलाद, दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगवी पोलिसांनी सराईत व समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर विविध कायद्यांनुसार कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत तीन टोळ्यांमधील २३ सराईत आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड व धोकादायक व्यक्ती, तसेच अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कायदा (एमपीडीए) अंतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी एकाला छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात, तर दुसऱ्याला कळंब येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
याशिवाय महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६ अंतर्गत सात सराईत आरोपींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांनी संशयास्पद हालचाली किंवा समाजविघातक प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


















