- दगडाने मारहाण करून चुलत्याचा खून…
- हिंजवडी पोलिसांची कारवाई; संशयित आरोपी ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. २५ ऑगस्ट २०२६) :- कासारसाई-कुसगाव रोडवरील कृष्ण मंदिराजवळ वनविभागाच्या जागेत दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून दगडाने मारहाण करून एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. २३ ऑगस्ट २०२६) रात्री घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत सोपान शितोळे आणि संशयित आरोपी जयवंता भगवंत तिडके (वय ५०, रा. कासारसाई-कुसगाव रोड) यांनी मद्यपान केले होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान हनुमंत शितोळे यांनी आरोपीला मारहाण करून त्याचा हात पिरगळल्याचे सांगण्यात आले आहे.
याचा राग मनात धरून आरोपीने परिसरात पडलेला दगड उचलून हनुमंत शितोळे यांच्या डोक्यात आणि छातीवर मारल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शितोळे यांचा मृत्यू झाला.
याबाबत मयुर जयवंत शितोळे (वय ३०, रा. कासारसाई) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वांगणेकर करत आहेत.


















