- सुरक्षारक्षकांशी बाचाबाची…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना वारंवार अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांसाठी आयुक्तांची भेट महत्त्वाची असतानाही अनेकदा भेटीसाठी आलेल्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
गुरुवारीही आयुक्तांच्या भेटीसाठी काही नागरिक महापालिका मुख्यालयात आले होते. मात्र, ठरलेल्या वेळेत आयुक्तांची भेट न झाल्याने नागरिकांचा पारा चढला. बराच वेळ प्रतीक्षा करूनही भेटीबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, सुरक्षारक्षकांकडून नागरिकांना अडविण्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती आणखी चिघळली. यावेळी काही नागरिक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. “आम्हीही आमचा वेळ काढून इथे येतो,” असा त्रागा नागरिकांनी व्यक्त केला.
नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आयुक्तांनी वेळ देणे अपेक्षित असताना भेटीसाठी आलेल्या नागरिकांनाच प्रतीक्षा आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयुक्तांची नागरिक भेटीसाठी निश्चित वेळ आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


















