न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ ऑगस्ट २०२६) :- क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल एक कोटी ३७ लाख ५७ हजार ८६३ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित रामभाऊ लांडगे (४२, रा. लांडगे आळी, भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आशुतोष संजय उन्हाळे आणि समाधान शंकर कदम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फिर्यादीनुसार, आरोपींनी परस्पर संगनमत करून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा आणि भरघोस परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादीने मोठी रक्कम गुंतवणुकीसाठी दिली. मात्र, आरोपींनी गुंतवणुकीवर कोणताही परतावा दिला नाही. तसेच मूळ रक्कमही परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार ९ मे २०२४ पासून २७ ऑगस्ट २०२६ पर्यंत भोसरीतील लांडगे आळी परिसरात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तब्बल सव्वा कोटींहून अधिक रकमेच्या या फसवणूक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.


















