न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २८ ऑगस्ट २०२६) :- मंदिरात आलेल्या एका महिलेच्या सासूला मदतीच्या नावाखाली विश्वासात घेऊन दोन भामट्यांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने लंपास केल्याची घटना चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील भोसले गावठाण परिसरात घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना बुधवारी (दि. २७) सकाळी साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिर परिसरात घडली. फिर्यादी महिला मंदिरात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या सासूशी संपर्क साधला.
आरोपींनी आपली आई आजारी असून तिच्या उपचारासाठी तसेच गरजू आणि वृद्ध व्यक्तींना मदत करण्यासाठी पैसे दान करायचे असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बोलण्यात गुंतवून महिलेच्या सासूच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने काढून घेतले.
सुमारे अडीच तोळे वजनाचे हे मंगळसूत्र काळ्या आणि काचेच्या पिवळ्या मण्यांनी सजलेले होते. आरोपींनी ते कागदात गुंडाळून पिशवीत ठेवल्याचे भासविले. मात्र, प्रत्यक्षात मंगळसूत्र घेऊन दोघांनी पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. दोन्ही आरोपींचा शोध चाकण पोलिस घेत आहेत.


















