न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ ऑगस्ट २०२६) :- जपानमधील पोस्टडॉक्टोरल संशोधक मिचिहिरो ओगावा ,शिनोबू इगुरो ,सेइका वाझाकी , वाकाको मियाझावा, सातोमी हिगाशी या शिष्टमंडळाने नुकतेच भात लागवडीतील जलव्यवस्थापनाच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी मावळ परिसरातील चांदखेड येथील शहा फार्म्सला भेट दिली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाला स्थानिक सिंचन पद्धती, पाण्याची उपलब्धता आणि भात लागवडीच्या पद्धतींची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाली.
शहा फार्म्सचे मालक ॲड. विजय शहा, प्रशांत शहा आणि डॉ. वार्तिका शहा यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान शिष्टमंडळाने सिंचनाच्या पद्धती, भात लागवडीचे चक्र, पिकानुसार पाण्याची गरज तसेच सिंचनाचे प्रमुख स्रोत याबाबत सविस्तर चर्चा केली. शहा फार्म्स ॲग्रीटुरिझमचे संचालक प्रशांत शहा यांनी भात लागवडीच्या विविध टप्प्यांची माहिती देताना फार्मवर अवलंबल्या जाणाऱ्या जलव्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींविषयी चर्चा केली. शिष्टमंडळाने शिवार फेरी करत भातशेतीची पाहणी केली, तसेच शेतातील पाण्याची पातळी, खुल्या विहिरी, बोअरवेल, शेततळे आणि बंधारे यांसारख्या विविध सिंचन स्रोतांची माहिती घेतली.
स्थानिक जलस्रोतांचे व्यवस्थापन आणि प्रशासन याबाबतही शिष्टमंडळाने माहिती जाणून घेतली. यामध्ये पाटबंधारे खाते व ग्रामपंचायतीची भूमिका, जलस्रोतांची देखभाल तसेच शेतकऱ्यांना सहाय्य करणाऱ्या विविध शासकीय अनुदान योजना आणि उपक्रमांचा समावेश होता. ॲड. विजय शहा यांनी फार्म विकसित करण्याचा आपला अनुभव सांगताना गावकरी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी रोटरीच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांवरही प्रकाश टाकला.
कृषी आणि ॲग्रीटुरिझम केंद्र म्हणून शहा फार्म्सने ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तसेच संशोधकांना ग्रामीण समुदायाशी जोडून स्थानिक शेती पद्धतींबद्दल अधिक माहिती करून देण्यास हातभार लावला. जलसंवर्धन, कार्यक्षम सिंचन आणि शाश्वत शेती याबाबत विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी अशा संवादांचा उपयोग होऊ शकतो. तसेच सुधारित कृषी पद्धती आणि उपलब्ध शासकीय सहाय्यव्यवस्थेबाबत अधिक माहिती मिळाल्याने त्याचा शेतकऱ्यांनाही लाभ होऊ शकतो.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने पिठलं व भाकरी यांसारख्या अस्सल महाराष्ट्रीय ग्रामीण भोजनाचा आस्वाद घेत स्थानिक संस्कृती आणि आदरातिथ्याचाही अनुभव घेतला. ही भेट कृषीविषयक ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय अनुभवांच्या अर्थपूर्ण देवाणघेवाणीचे प्रतीक ठरली. संशोधन आणि स्थानिक पातळीवरील शेती यांच्यातील दुवा अधिक दृढ करण्यासोबतच, भविष्यातील शेती आणि ग्रामीण समुदायांसाठी शाश्वत जलव्यवस्थापनाचे महत्त्वही या भेटीतून अधोरेखित झाले.


















