- पिंपरी-चिंचवड पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२६) :- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. परिमंडळ-२ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १९ सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड (गुन्हे) आणि अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मुंबई पोलीस अधिनियम १९५९ मधील कलम ५६ अंतर्गत तडीपारीचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहन नानासाहेब शेंवते (२४), विद्या अनिल राठोड (४२), रेश्मा मिथुन आटोटे (३४) यांचा समावेश आहे. काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंकज संतोष चोथे (२७), आदित्य बाबासाहेब शेंडगे (२२), युवराज चांगदेव फुगे (२२), आशिष उर्फ दादल्या एकनाथ शेटे (२४), श्रवण विजय माचरे (२०), सुशील बाळू शिंदे (२३) आणि ऋतीकेश हरी आटोळे (२३) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमिन खाजाभाई शेख (५५), नितीन पांडुरंग गव्हाळे (२७), अशोक सदाशिव गायकवाड (४१) यांना तडीपार करण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्योती नटवर उर्फ नटरु मारवाडी (४१), अक्षय विलास नांगरे (२१) आणि ॲडविन अँथोनी फर्नांडीस (३०) यांच्यावरही कारवाई झाली.
बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरणदेवी मनोज नट (२९), संदीप बबन भुंडे (४६), नितीन रामेश्वर भारती (२५) आणि सम्राट भागवत शिंदे (२०) यांना तडीपार करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


















