- इतर सुरक्षा रक्षकांकडूनही दरमहा पैसे उकळल्याची तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. १२ सप्टेंबर २०२६) :- सुरक्षा रक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे घेतल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहरसिंग राजाराम राजपूत (वय ४०, रा. सिल्वर ट्रेजर, बी विंग, वडगाव, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी सत्यवीर सिताराम सिंग (वय २२, व्यवसाय सिक्युरिटी सुपरवायझर, रिअलप्रो सिक्युरिटी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते सध्या बधलवाडी, ता. मावळ येथे वास्तव्यास असून मूळ जम्मू-काश्मीर येथील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवलाख उंबरे, ता. मावळ येथील ग्लोबल डॅनफोस कंपनीच्या परिसरात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपीने फिर्यादीचे सहकारी चैन सिंग, बिशन सिंग, जसबीर सिंग, सागर सिंग, काकाराम सिंग, टुनटुन दास यांच्यासह अन्य सात सुरक्षा रक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची तसेच पुन्हा नोकरीवर ठेवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्याबदल्यात फिर्यादीकडून १९ हजार ८०० रुपये घेण्यात आले. तसेच प्रत्येक सुरक्षा रक्षकाकडून दरमहा सुमारे दोन हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
यावेळी शिवीगाळ, मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप असून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३०८ (२), ३०८ (३), ३५२, ३५१ (२) आणि ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.


















