- गाडीचे भाडे देण्यावरून वाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १२ सप्टेंबर २०२६) :- गाडीचे भाडे देण्यावरून झालेल्या वादातून लॉज चालकाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रसन्न उर्फ भावडया मधुकर मुंगसे (वय २८, रा. काळे कॉलनी क्र. १, आळंदी), सुमित सुदाम आडागळे (वय २९, रा. देहूफाटा, आळंदी) आणि महेश दत्तात्रय तनपुरे (वय २६, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी रोहित गोविंदराव एन्नावार (वय २६, व्यवसाय नोकरी, रा. काव्या लॉज, कुणाल गार्डन हॉटेलजवळ, काटे कॉलनी बसस्टॉपजवळ, चोली बुद्रुक, ता. हवेली) यांनी दिघी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काव्या लॉजच्या गेटजवळ हा प्रकार घडला. आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीकडे गाडीचे भाडे मागितले. फिर्यादीने भाडे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर अन्य दोघांना बोलावून घेत तिघांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचे सहकारी अभिजित टिपरसे आणि प्रल्हाद महाजन आले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच जवळील केजीएन बिर्याणी हाऊसच्या बाहेर ठेवलेल्या पातेल्याच्या झाकणाने फिर्यादीसह दोघांना डोक्यात व पाठीत मारहाण केली. या मारहाणीत प्रल्हाद महाजन यांच्या उजव्या मनगटाला गंभीर दुखापत झाली.
दिघी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुसळे करीत आहेत.


















