- ओमकार सोसायटीतील धक्कादायक घटना..
- आयटी इंजिनिअर गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २१ सप्टेंबर २०२६) :- देहूगाव येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २०) सकाळी समोर आली. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यानंतर पतीने स्वतःवर वार करून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुभांगी आकाश बारस्कर (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती आकाश रामदास बारस्कर (वय २६) हा या घटनेत जखमी झाला आहे. दोघेही देहूगाव परिसरातील ओमकार सोसायटीमध्ये भाड्याने राहत होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ओमकार सोसायटीच्या परिसरात एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता आकाश हा रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याचवेळी इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत शुभांगी गंभीर अवस्थेत पडलेली होती. दोघांनाही तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शुभांगीला तपासून मृत घोषित केले. शुभांगीच्या मृतदेहाचे पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आकाशवर सध्या उपचार सुरू आहेत.
आकाश हा हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. तर शुभांगीदेखील खासगी कंपनीत नोकरी करत होती. डिसेंबर २०२३ मध्ये दोघांचा विवाह झाला होता. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ते देहूगावातील ओमकार सोसायटीत राहत होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पती-पत्नीमध्ये मागील काही काळापासून कौटुंबिक कारणावरून मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. या वादातूनच आकाशने शुभांगीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर त्याने स्वतःवर वार करून गॅलरीतून उडी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलिसांकडून सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्याची परिस्थिती तपासली जात आहे.

















