न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २१ सप्टेंबर २०२६) :- जुना वाद मिटविण्यासाठी एकत्र आलेल्या सहा जणांमध्ये पुन्हा वाद झाल्याने सार्वजनिक रस्त्यावर हाणामारी आणि गोंधळ घातल्याची घटना चिंचवड येथील स्पाईन रोडवरील रेल विहार सोसायटीजवळ घडली. याप्रकरणी सहा जणांविरोधात चिंचवड पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रेल विहार सोसायटी, स्पाईन रोड, चिंचवड येथे अरविंद दशरथ वाघमोडे (वय २३, रा. बिजलीनगर), वंश चेटटे (वय २४, रा. चिंचवड), प्रेम वाघमोडे (वय २०, रा. बिजलीनगर), आकाश बबन नाळे (वय ३३, रा. दगडोबा चौक, चिंचवड), विजय डोंगरे (वय २४, रा. दगडोबा चौक, चिंचवड) आणि रोहित म्हस्के (वय २१, रा. दगडोबा चौक, चिंचवड) हे एकत्र आले होते.
जुना वाद मिटविण्याच्या उद्देशाने त्यांची बैठक झाली होती. मात्र, यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी सार्वजनिक रस्त्यावर एकमेकांना दुखापत करण्याच्या उद्देशाने मोठमोठ्याने आरडाओरड करत गोंधळ घातला. तसेच एकमेकांची गचांडी पकडून हाताच्या ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकारामुळे सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली. याप्रकरणी पोलीस शिपाई राहुल रामदास जगताप यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सपोनि शेरखाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


















