न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २१ सप्टेंबर २०२६) :- बहिणीची छेडछाड केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३५ वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईसमोरील मोकळ्या जागेत घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या पूर्वी कावेरीनगर भाजी मंडईसमोरील कचरा टाकण्याच्या ठिकाणाजवळील मोकळ्या जागेत हा प्रकार घडला. मारोती बनसोडे (वय ३५, रा. बीड; सध्या रा. दत्तनगर, चिंचवड) याच्यावर हल्ला करण्यात आला.
आरोपींच्या बहिणीची छेडछाड केल्याच्या कारणावरून मारोती बनसोडे याला आरोपींनी अडविले. त्यानंतर त्याच्या तोंडावर, गळ्यावर, हनुवटीवर तसेच गुप्तांगावर कशाने तरी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मारोती बनसोडे याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अमित दशरथ साळुंखे (वय २६, रा. थेरगाव), किशोर वाघमारे (वय ३९, रा. थेरगाव) आणि भारत पवार (वय २३, रा. थेरगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सुग्रीव गायकवाड (वय ५४, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. मोशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


















