- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २१ सप्टेंबर २०२६) :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेतून आणि स्वतःच्या हातांनी सुंदर गणपती मूर्ती साकारल्या.

संजय वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. शाळेचे अध्यक्ष संदीप काटे आणि नगरसेविका तथा उपाध्यक्षा अनिताताई काटे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्राचार्या ज्योतिका मलकानी यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मूर्ती निर्मिती करताना विद्यार्थ्यांनी विविध आकार, रचना आणि सजावटीचा वापर करून आपल्या कल्पनाशक्तीला वाव दिला. स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती साकारण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला. त्याचबरोबर पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
यावेळी शाळेचे अध्यक्ष संदीप काटे म्हणाले, “गणेशोत्सव हा आपल्या संस्कृती आणि परंपरेशी जोडलेला महत्त्वाचा सण आहे. मात्र, उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे भान राखणे हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली, तर त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या भविष्यातील आचरणावर होतो. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार केल्यामुळे त्यांना सर्जनशीलतेसोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून मिळाला आहे. अशा उपक्रमांमधून संस्कृती, परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधला जातो.”

















