- शहर शिवसेनेला मिळणार हत्तीचं बळ..
- प्रभागनिहाय मुलाखती; सक्रिय आणि सक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भर – शहराध्यक्ष चेतन पवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची घोषणा लवकरच होणार आहे. शहराध्यक्ष चेतन पवार यांनी कार्यकारिणीसाठी निवडलेल्या सक्षम कार्यकर्त्यांची यादी सोमवारी (दि. २१) मुंबई येथे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडे सुपूर्द केली. त्यामुळे शहरातील नव्या कार्यकारिणीच्या घोषणेकडे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जून २०२६ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखती प्रभागनिहाय घेण्यात आल्या असून, विविध जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची संघटनात्मक क्षमता, पक्षातील सक्रिय सहभाग, सामाजिक कामातील योगदान तसेच पक्षाच्या कार्यक्रमांमधील सहभाग याचा विचार करण्यात आला आहे.
शहराध्यक्ष चेतन पवार यांनी सांगितले की, केवळ पदाची इच्छा व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी प्रत्यक्ष मैदानात सक्रियपणे काम करणाऱ्या आणि पक्ष संघटना वाढविण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातून सक्षम कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतही शहरातील विविध प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर भर दिला. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील संघटनात्मक परिस्थिती, कार्यकर्त्यांचा सहभाग आणि पक्षाच्या कामकाजाबाबतची माहिती जाणून घेण्यात आली. त्यामुळे नव्या कार्यकारिणीत प्रभागनिहाय सक्रिय कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळेल. दरम्यान, कार्यकारिणीची यादी सोमवारी मुंबईत संजय राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून अंतिम मंजुरीनंतर लवकरच शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती चेतन पवार यांनी दिली.
नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी काळात पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे कार्यकारिणीत कोणाकोणाला स्थान मिळते, याकडे शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांसह शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

















