- दुसऱ्या वाहनाशी धडक; अमित गोरखे थोडक्यात बचावले…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नाशिक | २१ सप्टेंबर २०२६ :- अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चासाठी जात असताना विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली. या वाहनामध्ये आमदार अमित गोरखे यांच्यासह मारुती जाधव, बाबासाहेब रसाळ, आनंद सुतार, महेश खंदारे, वाहनचालक रामचंद्र जाधव तसेच अंगरक्षक सूरज आणि अभिजीत हे उपस्थित होते.
या अपघातात आमदार अमित गोरखे हे थोडक्यात बचावल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित महामोर्चासाठी जात असताना हा अपघात झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.
आमदार अमित गोरखे हे अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भूमिका मांडत असून, याच मागणीसाठी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी ते रवाना झाले होते.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच आमदार अमित गोरखे यांच्यासह वाहनातील इतर व्यक्तींच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

















