- सातव्या दिवशी डीजे मिक्सर, स्पीकर व डीजे सेट जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | २१ सप्टेंबर २०२६ :- गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान उच्च क्षमतेचे डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी पोलिसांनी ९ ते १० गणेश मंडळांवर कारवाई केली. या कारवाईत डीजे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले असून संबंधित गणेश मंडळांचे पदाधिकारी, डीजे मालक व चालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सण-उत्सवाच्या काळात सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ९ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १ वाजल्यापासून २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम तसेच ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साधनांच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाबाबत गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांसोबत पोलिसांकडून वेळोवेळी बैठका घेऊन लेखी स्वरूपात सूचना देण्यात आल्या होत्या.
२० सप्टेंबर रोजी ९० मंडळांच्या मिरवणुका..
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या सातव्या दिवसाच्या एकूण ९० गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका होत्या. यापैकी काही मंडळांनी बंदी असतानाही उच्च क्षमतेचे डीजे व डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ५ डीजे मिक्सर, ३ डीजे कन्सोल, १ लाईट कंट्रोल मशीन, ३ लॅपटॉप, १ स्पीकर तसेच १ डीजे सेट जप्त केला. यामध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली व स्पीकरचा समावेश आहे.
संबंधित गणेश मंडळे तसेच डीजे मालक व चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यामध्ये सांगवी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त मनिषा कदम, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नांदेकर यांच्यासह अधिकारी व तपास पथकातील अंमलदार सहभागी झाले.
पोलिसांचा गणेश मंडळांना इशारा…
गणेशोत्सव २०२६ तसेच आगामी गणपती विसर्जन मिरवणुकांदरम्यान कोणत्याही गणेश मंडळाने उच्च क्षमतेचे डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम किंवा ध्वनीप्रदूषण करणाऱ्या साधनांचा वापर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर पूर्वसूचना न देता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम, डीजे मिक्सर व कन्सोल जप्त करण्यात येतील. या कारवाईस संबंधित मंडळांचे पदाधिकारी व आयोजक जबाबदार राहतील, असा इशारा पोलीस उपआयुक्त संदिप आटोळे यांनी दिला आहे.

















