न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | २१ सप्टेंबर २०२६ :- शहरातील अनधिकृत ओव्हरहेड केबल्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा तसेच शहराच्या सौंदर्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने केबल ऑपरेटर्सनी अनधिकृत केबल्स तातडीने हटवाव्यात, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात केबल ऑपरेटर्सच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पुढील वर्षभरात शहरातील केबल्स भूमीगत करण्याचे महापालिकेचे लक्ष्य असून, त्यासाठी महापालिकेकडे सुमारे ६१० किलोमीटर पाईप्सचे जाळे उपलब्ध आहे.
बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, नगरसदस्य कुणाल वाव्हळकर, उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, सह शहर अभियंता अनिल भालसाकळे, सह शहर अभियंता महेश कावळे यांच्यासह संबंधित विभागांचे उपअभियंता, कर्मचारी आणि विविध केबल ऑपरेटर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिकेकडून केबल व्यवस्थेसाठी प्रस्तावित SOP तयार करण्यात येत असून, परवानगी प्रक्रिया, भूमीगत केबल्सचा वापर आणि अनधिकृत तसेच वापरात नसलेल्या केबल्स हटविण्याबाबत नियमन करण्यात येणार आहे.


















