- पिंपळे सौदागरच्या सामाजिक, आध्यात्मिक वाटचालीचे जगताप यांच्याकडून कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 22 सप्टेंबर 2026) – पिंपळे सौदागर हे गाव आज जागतिक नकाशावर पोहोचले असले, तरी परिसराची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा जपण्याचे काम क्रांती क्रीडा मंडळाने सातत्याने केले आहे. सामाजिक उपक्रमांसोबतच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यात मंडळाचे योगदान मोलाचे आहे, असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले.
क्रांती क्रीडा मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायांची आरती सोमवारी सायंकाळी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. मंडळाच्या वतीने उद्योजक संदीप काटे यांनी जगताप यांना आरतीसाठी निमंत्रित केले होते. आरतीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले.
आमदार जगताप म्हणाले, “क्रांती क्रीडा मंडळाकडून गणेशोत्सवासह वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी यांसारखे विविध सण आणि राष्ट्रीय दिन मंडळाकडून उत्साहात साजरे केले जातात. सामाजिक बांधिलकी जपत सांस्कृतिक परंपरा पुढे नेणाऱ्या या मंडळाला माझ्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.”
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेविका अनिता काटे, कुंदा भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, निलेश काटे, धीरज काटे यांच्यासह क्रांती क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

















