- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कामकाजावर आचारसंहितेचे सावट..
- निवडणूक कार्यक्रम जाहीर; नवीन प्रकल्प, उद्घाटनांवर निर्बंध…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ सप्टेंबर २०२६) :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारतीय निवडणूक आयोगाने आज मंगळवारी (दि. २२) जाहीर केला. त्यानंतर पुणे मतदारसंघात आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या नियमित कामकाजावर परिणाम होण्याबरोबरच नवीन घोषणा, विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन तसेच राजकीय प्रसिद्धीच्या कार्यक्रमांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
राज्यात औरंगाबाद, पुणे व नागपूर हे तीन पदवीधर आणि अमरावती व पुणे हे दोन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अरुण लाड, तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे.
निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबरला मतमोजणी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
महापालिकेच्या कामकाजावर परिणाम…
दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकीय स्वरूपाच्या कार्यक्रमांवर, नव्या घोषणा व प्रसिद्धीवर प्रशासनाला निवडणूक नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेतील नवीन विकासकामांच्या घोषणा, उद्घाटने, भूमिपूजने आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारात्मक उपक्रमांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नागरिकांना आवश्यक असलेले नियमित, अत्यावश्यक आणि सुरू असलेले प्रशासकीय कामकाज नियमानुसार सुरू राहणार आहे. पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने आता राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चिती आणि प्रचाराची तयारी वेग घेणार आहे

















