- कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २२ सप्टेंबर २०२६) :- चाकण परिसरात थार वाहन बेदरकारपणे चालवून इतर वाहनांना धडक देत नुकसान केल्याप्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुखदेव हनुमंत नाईक (वय २९, रा. सांगली) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वडगाव घेनंद, ता. खेड येथे घडली. आरोपी त्याच्या ताब्यातील थार वाहन मोशी ते चाकण तसेच चाकण चौक ते शिक्रापूर मार्गावर निष्काळजीपणे चालवत होता. या वेळी त्याने साक्षीदारांच्या वाहनांना धडक देऊन नुकसान केले. तसेच अविनाश गोविंद मोरे (वय २०) यांच्या तोंडाला किरकोळ दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर संबंधितांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने वाहनातून उतरून तक्रारदार व त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन घातल्याचा आरोप आहे. कर्मचारी बाजूला पळाल्यानंतर आरोपीने पुन्हा सरकारी वाहनाला धडक दिली. त्यानंतर वाहन वळवून तक्रारदार आणि कर्मचाऱ्यांच्या दिशेने वेगाने वाहन नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेत तक्रारदाराच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून सरकारी वाहनाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


















