न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. २२ सप्टेंबर २०२६) :- फेसबुकवर पाहिलेल्या चारधाम यात्रेच्या जाहिरातीवर विश्वास ठेवून प्रवासाचे बुकिंग करणाऱ्या रावेतमधील ६६ वर्षीय नागरिकाची ४ लाखांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रामनिवास गुप्ता (वय ६६,) हे रावेत येथील रहिवासी आहेत. २७ जुलै ते २६ ऑगस्ट या कालावधीत ते घरी असताना त्यांच्या मोबाइलवर फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चारधाम यात्रेसाठी हिमालयन हेली सर्व्हिसेस कंपनीची जाहिरात दिसली.
जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ‘अभिषेक सर हिमालयन टूर्स’ नावाने संपर्क करणाऱ्या व्यक्तीने चारधाम यात्रेची माहिती दिली. त्याच्या सांगण्यावरून तक्रारदारांनी यात्रेसाठी ऑनलाइन पैसे पाठविले. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र विमा काढावा लागणार असल्याचे सांगून आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर तक्रारदारांना संशय आल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. तसेच विमानाची बुकिंग तिकिटे रद्द करून तक्रारदारांच्या खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा तपास सुरू आहे.

















