- अग्निशमन यंत्रणेचे सेफ्टी ऑडिट..
- ९० मीटरपर्यंतच्या हायड्रोलिक शिड्यांची आयुक्तांकडे केली मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ सप्टेंबर २०२६) :- पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज २ सोसायटीत १८ सप्टेंबर रोजी झालेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
शहरातील २० ते ३० मजली इमारतींच्या पार्श्वभूमीवर ५० ते ९० मीटर किंवा त्याहून अधिक उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या अत्याधुनिक हायड्रोलिक शिड्या व प्लॅटफॉर्म्स अग्निशमन ताफ्यात तातडीने समाविष्ट करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अग्निशमन दलातील वाहने, पंप, ऑक्सिजन मास्क आणि बचाव साहित्याचे तातडीने ‘सेफ्टी ऑडिट’ करून नादुरुस्त उपकरणे बदलण्याची मागणी करण्यात आली.
शहरातील सोसायट्यांचे फायर ऑडिट किती झाले, त्रुटी आढळलेल्या सोसायट्या किती आणि किती ठिकाणी नोटिसा बजावल्या, याचा अहवाल सात दिवसांत जाहीर करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. जवानांना उंच इमारतीतील बचावकार्याचे विशेष प्रशिक्षण देऊन नियमित मॉकड्रिल घेण्याची सूचनाही काटे यांनी केली. गणेशम फेज २ची घटना ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, असे काटे यांनी म्हटले.

















